पाळीव प्राणी हे अगदी प्राचीन काळापासूनच मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. मनुष्याने प्राण्यांवर खूप प्रेम केले, कधी हौसमौज म्हणून तर कधी काम ( मदत ) करण्याच्या हेतूने देखील पाळीव प्राणी पाळले जातात. जसे कुत्रा सुरक्षेच्या दृष्टीतून तर आहेच पण कुत्रा पाळणे आज एक स्टेटस समजले जाते. बैल शेतीसाठी तर गाई, म्हशी, बकन्या दुधासाठी उत्पन्नासाठी पाळल्या जातात. काही प्रांतामध्ये घोडे, उंच याक हे देखील पाळले जातात. त्याच प्रमाणे मेंढी, मांजर, कोंबड्या, पोपट, लवबर्ड, व इतर पक्षी देखील हौस म्हणून पाळले जातात. हे प्राणी देखील मनुष्यावर तितकेच प्रेम करताना दिसून येतात.
एकदा का आपण प्राणी पाळायला आणले की त्याचे व आपले ऋणानुबंध जोडले जातात. आपल्या घरातील एखाद्या लहान मुलांप्रमाणे आपण त्याची काळजी घेऊ लागतो व तो प्राणी देखील आपल्याला जीव लावतो. त्याचा आहार, व्यवहार व आरोग्य याची काळजी आपल्याला असते.
मग वास्तूचे मार्गदर्शन घेताना हे प्रश्न कसे सुटतील?
एखादा वास्तूतज्ञ वास्तुपरिक्षणाला गेला असता आमच्या अमुक प्राण्यासाठी कोणती दिशा चांगली हा प्रश्न सर्रास विचारला जातो. खर तर प्राणी फार संवेदनशील असतात. माणसापेक्षा त्यांची इंद्रिय खूप तल्लख असतात. कोणतीही भौतिक घटना घडणार असेल तर त्यांना त्याचा आभास सर्वात आधी होतो. कोणती जागा चांगली किंवा वाईट त्यांना चांगले माहीत असते, परंतु आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्याला त्यांना बांधून ठेवावे लागते किंवा गाई- म्हशींसाठी गोठे तयार करावे लागतात.
साधारण तट्टा, कुत्रा, गाय, म्हैस हे जिथे सकारात्मक ऊर्जा आहे अशा जागी बसतात. तर मांजर, मुंग्या, सर्प हे नकारात्मक ऊर्जेच्या ठीकाणी बसतात. हे अगदी नैसर्गिक आहे, परंतु जेव्हा या प्राण्यांना बांधून ठेवण्याची वेळ येते तेव्हा दिशेचा विचार करावा लागतो.
अनेक परीक्षणानंतर असे सिध्द झाले आहे की कुत्रा, गाय, म्हैस यांना उत्तर- पश्चिम म्हणजेच वायव्य (NW), उत्तर (N), पूर्व (E) व दक्षिण-दक्षिण-पूर्व (SSE) मध्ये ठेवल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहते व व्यवहार देखील चांगला राहतो. या व्यतिरिक्त ईशान्य (NE) व आग्नेय (SE) दिशांना त्यांचे आरोग्य बिघडते. पोपट, कबुतर, पक्षी यांना देखील हिच दिशा जी कुत्रा, गाय, म्हशींसाठी चांगली आहे ती चांगली मानली गेली आहे.
ईशान्य (NE), आग्नेय (SE), दक्षिण-दक्षिण-पश्चिम (SSW) व पश्चिम-उत्तर-पश्चिम (WNW) या झोनमध्ये बांधलेले घोडे कधीच रेस जिंकत नाही. या झोन व्यतिरिक्त ठिकाणी जर घोडे बांधले तर ते निरोगी, स्वस्थही राहतात व त्यांचा व्यवहार देखील चांगला राहतो आणि जॉकी ने दिलेली कमांड देखील ऐकतात.